Friday, May 18, 2012

मी चुकतेय का रे?


नजरेत भरलेला वैताग
ओठात अडकलेली जुनीच तक्रार
डोक्यात कोंडलेला राग
अन् तरी मनाचा हळवा विश्वास
सांग मी चुकतेय का रे?
नशिबाच्या रेषांत गुंतलेले हात
नात्यांच्या भोवर्यात अडकलेला पाय
पत्ता हरवलेली सारी वाट
अन् तरी मुक्कामाचा मनी ध्यास
सांग मी चुकतेय का रे?
आरशातला तो अनोळखी चेहरा
नकोनकोसा तरी चढवलेला मुखवटा
विस्कटलेला डाव सारा
अन् तरी सारं सारं सांधायाची आस
सांग मी चुकतेय का रे?
तुला कळत होते ना हे सारे बदल
बदलत गेलेलं सारं समिकरणं
नव्या समिकरणांचे जुनेच प्रश्न
अन् तरी…
सारं उत्तरण्याचा माझा वेडा अट्टाहास
आता तरी सांग मी चुकतेय का रे?

No comments:

Post a Comment