Sunday, October 21, 2012

तुटक तूटक

घट्ट मिटल्या दाराआडचा
एक अंधुकसा उजेड...
मुक्तीचा मार्ग शोधत..
चुकुन एक थाप दारावर
अन् त्याच्या उभ्या अंगांची थरथर..
अस्पष्ट..अनमिक भिती..
तरीही किलकिल्या दरवाजाची ओढ..
------------------------
किती रे बहाणे तुला साधण्याचे
तुझ्या 'तुपणात' खुळे 'मीपण' गुंफ़ण्याचे

कसे रे कळावे तुला हे कधी अन्
नजरेत एका असंख्य ठोके इथे चुकायचे

गंधओल्या श्वासाची निमित्तास भेट
खरे वेध आता खुले स्पर्शण्याचे
-------------------------
सोस उत्तरांचा नव्हता तसा कधीही 
त्याच त्या रेंगाळत्या प्रश्नास फक्त नकार...

किती रे अडकावा जगण्याच्या गुंत्यात पाय
वाटे कधी द्यावा हसत मरण्यास होकार
-----------------------------------

पिंजारल्या केसांची एक म्हातारी राहे काळ्या नभात
एका थेंबासाठी भरडत जाते कोरडे ढग कोर्या जात्यात....
अंदाजानेच तर आलोय इथवर
चुकत माकत, ठेचाळत... 
अंदाजानेच शोधल्या वाट...
तसे तर जन्मापासूनच सारे अंदाज..
अगदी मरणापर्यंत सोबतीला...
तळपत्या वैशाखाचे अंदाज
बहरत्या श्रावणाचे अंदाज...
पावलापावलावर आजमावणारे अंदाज
तरीहि चुकलेलेच बरेचशे..
इतके सवयीचे झालेत हे कि
आताशा नकळतपणे मनात
अनोळखी मनाचेहि अंदाजच ...
ठीकच आहे म्हणा....
पण म्हणून ...
एका अवघड क्षणी जोडलेलं नात
वर्षानुवर्ष अंदाजानेच खेचायच..????
वेड्यागत बहरत जावी
अनामिक नात्यांची ही वेल
भर वैशाखातही बरसुन जावी
जशी ओली श्रावणाची सर..
------------------------------
वेळुच्या रानातुन घुमते
गुढ सुरांची तान
जपल्या जीवाने तेथेच हरावे
अबोल चाहुलीचे भान..
------------------------------
विसरत चाललेय आताशा..
धाय मोकलुन रडणंही..
कोरड्या डोळ्यातच उमटते हल्ली
अनाम् अबोल घुसमटही
---------------------------
मनाचा मनाशी असा खेळ चाले 
चुकार हळव्या ठोक्यांचा इथे अर्थ लागे 
अनोळखी स्पर्शाची ती ओळखीची भाषा 
अन गंधओल्या श्वासांची मनी ओढ दाते
------------------------------
उरीच जपल्या जखमा
न बाजार मांडला मी कधी..
तिरपांगड्या तुझ्या संसाराचा
सांग मग तमाशा झाला कधी??
गडद रेखल्या काजळाचा
काळाकुट्ट पाउस..
अस्मानी डोळ्यातुन पाझरता
पागोळ्यांचा पाउस...

क्षितीजावर रेंगाळता
सुर्यसखा तो पाउस..
धरतीच्या घट्ट मिठीतला
कधी प्रियकर होई पाउस..

डोंगरदर्यात रमलेला
मुक्त कलंदर पाउस..
अवखळ लाटांवर स्वार
भर यौवनातला पाउस...

कलत्या सांजेला थबकता
हळवा ओला पाउस..
परतीच्या वाटेवरचा कसनुसा
उदास रडवेला पाउस..

Wednesday, September 5, 2012

लहानपणीचा भातुकलीचा खेळ ते
हा तारुण्याचा उंबरठा
किती लहानसा वाटला गं हा प्रवास 
वेड्यावाकड्या रस्त्यांवर,
प्रत्येक धोक्याच्या वळणावर,
एकेमेकींना सावरत..सांभाळत.
इथवर तर् पोहचलो बघ सखे
ना तळपत्या उन्हाची तमा
ना कोसळत्या पाण्याची फिकीर..
सावलीची सोबत असताना
सांग कशाला गं घाबरायचं?
पण...
पण तरी आज उर धपापतोय गं
का कुणास ठाउक.... वाटतयं
ह्या वळणावर रस्ताच संपलाय अचानक
सवयीने..सोबतीने चालत आलो इथवर..
पण...पण आज पायाखालची जमीनच संपली तर गं?
दरीत खोल खोल उतरताना... मिट्ट काळोखाच्या गर्तेत
सखे जीवाल साथ देशील?
लाल पिवळ्या भिंतींची , 
थेंब थेंब गळत्या छपरांची 
चिंब ओल्या शेंबड्या पोरांची ,
अन कातावलेल्या आयांची , 
अस्वस्थ चिखल वस्ती...
एका रात्रीत उगवणारी,
दुसर्या रात्रीत विझणारी,
अन तरी सवयीचीच भासणारी
जुन्या जाणत्या रस्त्यांवरची पावसाळी वस्ती...
भर पावसाळी पहाटे
निद्रीस्त रस्त्याच्या कडेला तेव्ह्ढी जाग..
...
दाराशीच निर्धास्त पहुडलेली
कळकटल्या चेहर्यावरची गोंडस निरागसता
काळ्याकुट्ट आभाळाला छेदत जाणारी
खरपुस खमंग धुरांची वलयं
उगवत्या दिवसाच्या चिंतेने 
तारटावलेले लाल डोळे
आणि तीन आडोश्यात स्वत:ला लपवणारी
तरी डोकावणारी लाज..
...अन....
नेमकं निरागसता, चिंता, धुर टाळत
ह्या लाजेला शोधणारी..
रस्त्याच्या सभ्य टोकावरची
हपापलेली भुक....
सारं काही समजुन जपलेली
जुन्या जाणत्या रस्त्यांवरची
शाहाणी सुरती वस्ती...

--------------------------------------------------------

जन्म सरला मातीत 
कोरड्या डोळ्यात आभाळ 
मरणाचा इथे सौदा 
जगण बंदिस्त काळजात
---------------------------------------------------------

विस्कटल्या श्वासलयीना सावरणारा सूर तू 
मागे पडल्या वळणावर हरवलेले माझे मीपण तू
-----------------------------------------------------

आभाळाच्या पल्याडचा देवाचा गाव
देवाच्या दारचा स्वप्नांचा बाजार 
बाजारात ह्या नशीब चलन 
एखादीच पहाट, खजील रात्रीच इथे हजार
-----------------------------------------

सटवाईच गोंदण म्हणे असत आभाळाभाळी 
तरी पुनश्च वेडा हट्ट तळहात चाचपण्याचा
------------------------------------------


Friday, May 18, 2012

उसी गली के उसी नुक्कड पे-3


कोर्नर का वो लंबासा लम्पपोस्ट
और उसके निचे खडा छोटासा वो..
अपने सपनोंकी उंचाई नापता हुआ..
कुछ अजीबही चमकति थी उसकी आंखे
उस उंचे लम्प की पीली रोशनीमे..
एक अलगही चाह थी उसे..
और..
और..
हा और शायद इंतजार था उसे..
ना ना... कोई मेहबुबा ना थी
ना ही ये कोई आशिक़ था..
वो इंतजार तो बस अपने मौत का था..
कहने को तो पागल कह भी देते लोग उसे..
उलझे हुए सवालोंमे सुलझा हुआ पागल..
सतरंगी ख्वाब देखनेवाला जिद्दी पागल...
हर एक पल मर्जीसे जीनेवाला पागल...
और्..
मौत की चाह मे सांसे गिनता वो पागल..
.
.
.
.
.
.
लेकीन किसी ने कुछ ना कहा..
शायद उन मे भी कही छुपा था
वो पागल.......
और शायद इसीलिये.....
.
.
.
.
.
उसी गली के उसी नुक्कड पे
वो आज भी खडा है..
सपनो से भरा उसका हर पल
उस इंतजार मे जीता हुआ

उसी गली के उसी नुक्कड पे-2


वैसे तो हमेशा ही भीड होती थी
उसी गली के उसी नुक्कड पे
वो फिरभी रहा अकेला
अपनेमे ही खोया हुआ..हमेशा..
कभी हसता था..
कभी गाता भी था..
अपने ही धुन मे ना जाने
क्या क्या छुपाता था..
दर्द तो देखा है 
हरेक ने उसकी आंखोमे
गम का वो आसु लेकीन
न जाने कहा छिपाके रखा था
उसे मिले हर शख्स के मन मे 
रहा हमेशा एक सवाल
उसकी हसी मे छिपे उस सन्नाटेका
दर्द से भरी उन मुर्दा आखोंका..
और्..और् ...
उससे जुडे उसके खालीपनका..
किसीने पुछा होता तो शायद जवाब मिलता..
पर..शायदही.. क्योंकी..
.
.
.
.

उसी गली के उसी नुक्कड पे
वो आजभी खडा है
थोडा घबराया...थोडा सहमासा.

उसी गली के उसी नुक्कड पे-1


उसी गली के उसी नुक्कड पे
वो दिखता था कभीकभी
थोडा घबराया...थोडा सहमासा..
न जाने क्या खोया है उसने
जो ढूंढता है दिनरात
कभी खुले आसमान मे
तो कभी कोने मै फ़ैली उस रेत मे
आते जाते लोग देखते थे उसे
कुछ हसते थे..कुछ रोते भी थे
पर ना पुछा किसिने के
"बाबा क्या ढुंढ रहे हो?
खोया हुआ बचपन
गुजरी हुइ जवानी
या...या...आनेवाला कल?"
पुछते तो शायद जवाब मिल जाता
उन खाली आंखोमे छिपे सवालोंका
जिसे वो अक्सर ढुंढा करता था
उन टुटे तारोंमे..पत्थर की लकिरोमे...
लेकिन्....
.
.
.
.
.
उसी गली के उसी नुक्कड पे
वो आजभी खडा है
थोडा घबराया...थोडा सहमासा..

आभाळ


फाटलेलं आभाळ आता तुझं तुच जोडायचं
ठिगळं हसण्याचे की पुन्हा आसवांचे तुझं तुच ठरवायचं

त्या आभाळाच्या भाळी बघ नशिबं कित्येकांची
भाग्यवान तशी कमीच बाकी फुटकीच बरीचशी

आभाळ सांधताना निसटेल चुकार तुकडा
जाता जाता उगा तोही करेल घाव उघडा

फाटक्या त्या आभाळातुन देवही बघेल कधी
फरफट त्याच्या लेकराची बघता रडेल तोही कधी

सभोवार विखुरले क्षण आनंदाचे तुझे तुच वेचायचे
आठवांच्या आसवांना दुर आता तुझे तुच सारायचे

मी चुकतेय का रे?


नजरेत भरलेला वैताग
ओठात अडकलेली जुनीच तक्रार
डोक्यात कोंडलेला राग
अन् तरी मनाचा हळवा विश्वास
सांग मी चुकतेय का रे?
नशिबाच्या रेषांत गुंतलेले हात
नात्यांच्या भोवर्यात अडकलेला पाय
पत्ता हरवलेली सारी वाट
अन् तरी मुक्कामाचा मनी ध्यास
सांग मी चुकतेय का रे?
आरशातला तो अनोळखी चेहरा
नकोनकोसा तरी चढवलेला मुखवटा
विस्कटलेला डाव सारा
अन् तरी सारं सारं सांधायाची आस
सांग मी चुकतेय का रे?
तुला कळत होते ना हे सारे बदल
बदलत गेलेलं सारं समिकरणं
नव्या समिकरणांचे जुनेच प्रश्न
अन् तरी…
सारं उत्तरण्याचा माझा वेडा अट्टाहास
आता तरी सांग मी चुकतेय का रे?

नाते


हळव्या नाजुक वळणावरचे
अवघडलेले नाते
भावबोलक्या डोळ्यांमधले
अवखळ अबोल नाते


अव्यक्त शब्दांमधले
कधी कविता होई नाते
सप्तसुरांच्या सुरावटीतले
कधी गाणे होई नाते


पेटत्या वैशाख वणव्यात
लीवळीव सर होई ते ना
तेनिसरड्या पाउलवाटांवर
च्याआधारपारंब्यासम नाते


घट्ट मिठीत चुकां
च्याकधी कठोर होई नाते
ओघळणार्या दोन आसवांस
 मोत्यांसम जपणारेही नाते


नव्या वळणावर नव्या तर्हेने
उलगडणारे नाते
कळुनही न कळलेले
एक रहस्य म्हणजे नाते

लेक


कशी इवलिशी लेक माझी
आज नववधू गं जाहली
भातुकली ती खेळातली
खरी मांडाया निघाली..
इवलिश्या तिच्या हाती
कधी फुले पारीजात
आज गंध गुलाबात न्हाहे
तिची वेडी हळवी प्रीत
कशी अवखळ बोलकी
लेक झाली ती अबोल
लाज दाटल्या डोळ्यात
आज तिच्या सख्याची चाहुल
कशी जीववेल्हाळ ही पोर
निघे सासुराच्या वाटा
माहेराच्या अंगणात पसरे
तिच्या आनंदाचा ठसा

नकोनकोसे म्हणताना


नकोनकोसे म्हणताना 
पुन्हा गुंतणेच उरते हाती
तोडायचे म्हणतानाही
मन धावते तुझ्याच पाठी
चिवट रे हा बंध नात्याचा
अवघड सोडने ह्या गाठी
खर्या खोट्या खेळात ह्या
रोज हारते मी तुझ्याचसाठी

लपवलेल्या जख्मांचा कधीही
ना बाजार मांडला मी
मनी जपल्या भावनांचा
तसा कोंडमाराच साहला मी
भोगताना भोग माझे 
ना तुला जरी कोसले मी
वेदना येता ओठी 
तुला आठवांत शोधले मी

वाटते कधी मलाही
का नाते असे हे कमनशिबी
क्षणाक्षणाला का जपावे
नवे घाव मी उराशी
समजुन घेताना तुला रे
जरी चुकले मी जराशी
बघ एकदाच फिरुनी
नव्याने एकरुप् होईल तुझ्याशी

देव


काय सांगु बाळा तुला
काय बोचते मला रे
देवपणासही ना चुकले माझ्या
कसे लपवु असंख्य घाव रे

दाटुन आलं आभाळ
की वेडं जग सारं नाचे
रडतो तो बाप्पा तिथे
अन् जग त्या आसवांत न्हाते

दगडातल्या देवाला
का इथे शोधतो तु?
मनाच्या गाभार्यात देव तुझा
का उगा सैरभैर तु?

माझेच जग माझे
मज अनोळखी भासले
निर्मिले मी एक जे
आज असंख्य वाटे जाहले

कुठे शोधिसी मंदिरात
देव का गाभर्यात आहे
बघ रे तु तुझ्यात क्षणभर
देव तिथे सुरक्षित आहे

न रुजलेल्या नात्यांचे


न रुजलेल्या नात्यांचे
मनी जपले बंध अजूनही
अधुर्या त्या वचनांचे
सल बोचरे अजूनही
न सुटले काही प्रश्न
शोध उत्तरांचा अजूनही
निसटलेल्या श्वासांचा
मनी हिशेब अजूनही
निसरड्या वाटांवर
पावलांचे ठसे अजुनही
तोल जाता पुन्हा
सावरल्याचे भास अजुनही
अर्थ त्य मौनांचे
उलगडतात नवे अजुनही
न बोललेले सारे
उगा आठवतं अजुनही
सुटले हात हातातले
तरी आहेस तु माझ्यात अजुनही
बघ डोकावुन माझ्या शब्दात
दिसशील तुच तिथे अजुनही

एकाकी गर्दी..


सगळी शहरं इथली
तशी इथुन तिथुन सारखीच
त्याच रस्त्यांवर् त्याच माणसांची
तीच एकाकी गर्दी..
अंतरं झाली छोटी रस्त्यांची
अन् वाढली दरी नात्यांची
ना कोणाला चिंता वा काळजी
ह्या आटणार्या मायेची
मरणार्यांचा ना शोक क्षणभर
ना नवजन्माचा उल्हासही
जो तो रमला स्वतःमधे
ना थांबला घेण्या श्वासही
माणुसकी रहीलीच नाही तशी
ह्या प्रेतांच्या वस्तीमधे
तरीही घेई रोज जन्म नवा
हा माणुस नव्या गर्भामधे

जगणं


किती ह्या तर्हा
जगण्याच्या…. जगू देण्याच्या…
कुणी स्वतःच्याच जगण्यात हरवलेला
अन् कुणी दुसर्यांसाठी जगुनही नामानिरळा
प्रत्येकाच्या जगण्याची एक चौकट
अन् अट्टाहास त्या चौकटितच जगण्याचा
काही अवलियांचा मात्र ध्यास
ह्या चौकटिबाहेर पडण्याचा
जगणं आपलं हे असं
एका रींगणाभोवती फिरणारं
एक् रींगण सोडता सोडता
पुन्हा दुसर्यात अडकत जाणारं
जगणं तर असतच मरण येइपर्यंत….
जरासं समजुन पहा हे जगण्यापल्याडचं आयुश्य
एकेका श्वासाचं मोल त्या क्षणातच उमगतं
तो क्षण गाठायचा कसा हा
मात्र ज्याचा त्याचा प्रश्न…

मैत्री


आयुश्याच्या प्रत्येक वळणावर
नवे साथीदार नवे सोबती
काही नाती मात्र आयुश्यभर टिकली
बहुदा त्याचेच नाव मैत्री...

खुप बोलले, खुप खेळले तिच्याशी
कधी रागवले, कधी भांडलेहि तिच्याशी
ती मात्र नेहमीच माझ्या शेजारी
बहुदा तिचेच नाव मैत्री....

तारुण्याच्या उंबरठ्यावर एक तो भेटला
अनेक वादळं उठली ह्या समाजबाह्य नात्याची
पण तो मात्र नेहमीच..
माझ्यासोबत.. फ़क्त माझ्यासाठी राहीला
बहुदा ह्याचेही नाव मैत्री

उतरणीला लागलं आयुष्य आता
अन् जोडिदाराची साथही सुटलेली
उरलेल्या श्वासांचे हिशेब करायल एक नवी सोबत मिळाली…
बहुदा तिचेही नाव मैत्री...

प्रत्येक वळणावर प्रत्येकवेळी एक
नवा अर्थ घेउन आलि हि मैत्रि
सुखाच्या अन् दुःखाच्या प्रत्येक क्षणात
वाटेकरु झालि ही मैत्री
आयुश्यभर पुरुनही
मनात अजुनहि कोवळि ती मैत्री
खरंतर आयुश्य जगण्याचा
चिरतरुण मंत्र देउन गेली ही मैत्री

आठवतं का रे सख्या तुला


आठवतं का रे सख्या तुला
तुझं ते एकटक माझ्याकडे बघणं
तुझ्या त्या नजरेत विरघळताना
माझं माझ्याही नकळतच लाजणं

आठवतं का रे सख्या तुला
तुझं ते बेभान होउन गाणं
तुझ्या त्या प्रेमाच्या स्वरात
माझं नखशिखांत न्हाणं

आठवतं का रे सख्या तुला
माझं तुझ्यात ते तसं गुंतत जाणं
तुझ्याशिवायच्या त्या एकेका क्षणाचं
मला पुन्हा एकाकी करणं

नको आठवुस तु सख्या आता
आठवेल आपल्या नात्याचं तुटणं
तुझा तो सततचा शोध कारणांचा
अन् माझं नेमकं तेच टाळणं

नको नको म्हणताना आज
पुन्हा सगळं काही आठवलं
तु येताच सामोरा असा अचानक 
गर्दितलं माझं रितेपण मला जाणवलं

न कळले तुला त्या क्षणांचे इशारे


अजब रे मौनातही गुपितांचे उलगडणे
न बोलुन काही तु बोललास सारे

आठवांच्या मैफलीत रंगले सुरेल गाणे
न मागता मिळाले देणं सप्तसुरांचे

शोधुनही न सापडले भास तुझ्या येण्याचे
न पाणावता डोळे वाटे धुसर आसमंत सारे

निघाले अनंताच्या प्रवासी बांधुन श्वास सारे
अजुनही का कळले न तुला रे त्या क्षणांचे इशारे

आता तरी येशील का?


रंगलेला खेळ सारा
चंद्र चांदण्यांचा संपला
रातही विझली सख्या
आता तरी येशील का?

छळते मजला आता
चाहूल तुझ्या पावलांची
भासतुनी सत्यात तू
आता तरी येशील का?

क्षण हळवे मिलनाचे
तू असे टाळू नको
आठवणीत रमताना
तू उगा उसासू नको

मिठीत तुझ्या विराघळण्या
जीव हा आसावला
सावरण्या तुझ्या प्रियेला
आता तरी येशील का?

समजूत…


समजूतदारपणे स्वतःला
समजावण्याची सवय झाली
आताशा तर जरा वेगळी वाटही
टाळायची सवय झाली
जातो परी सामोरे धैर्याने
भीती तरी ना कमी झाली
बंदिस्त माझी चाकोरी प्यारी
तोडायाची ना हिंमत झाली
कोणी म्हणे स्वार्थी तु
तो स्वार्थही आज गरज झाली
फुकट्यांच्या ह्या जगात सार्य़ा
दयेचीही भीक झाली
एकसुरी ह्या जगण्यात आता
मोकळं हसण्याचीही चोरी झाली
वेडं म्हणेल दुनिया सारी
म्हणत भावना ती शुन्य झाली
खोट्या खोट्या मुखवट्याआड
माझं मीपण मी हरवुन गेली
हसता हसता रडण्याचे आज
कसब नवे शिकुन गेली

सर

सरसर सरसर धावुन येई सरींवर सर
दार नभाचे तोडुन कोसळते ती सर
करी त्रुप्त सुकल्या धरणीस ती सर
बरसता बरसता अचानक थांबते ती सर
पानाफुलातुन सर झाडावेलीतही सर
थेंबा थेबातही अबोल असतेच् रे सर
म्हटली तर मोठ्ठी म्हटलं तर् इवलिशी ती सर
कधी फाटते आभाळ कधी ओंजळित ती सर
सापडे अवचित दरीखोर्यातही सर
उंच उंच झाडाच्या तळाशीही सर
हळव्या स्वरांच्या गाण्यातही सर
पाण्यासरख्या आसवांचा पुर म्हणजे सर

खुप वाटते कधीतरी


खुप वाटते कधीतरी
मुसळधार पावसात चिंब भिजावं
खोटा खोटा पैसा देऊन पावसाला
पुन्हा पुन्हा बोलवावे

खुप वाटते कधीतरी
मनसोक्त गावं
आयुष्याचे सुर निसटले तरी
काहीतरी गुणगुणावं

खुप वाटते कधीतरी
जोरजोरात रडावं
मनातले दुःख
एकदातरी जगासमोर मांडावं

खुप वाटते कधीतरी
दूर करावी ही घुसमट
मोडून मनाची दार
तोडावी ही आयुष्याची चौकट

कितीही वाटले तरीही
खरचं हे शक्य असते?
नियतीला चुकवून पुन्हा खेळ मांडणं
खरच इतके कठिण असतं?

भाउ माझा

कसं सांगु सखे तुला
कसा माझा भाउ गं
मनानी जोडलयं हे नातं
तुला कसं समजावु गं
पुर्वजन्मीचं पुण्य समजु की
ह्या वेडीचं नशीब गं
रक्ताच्या नात्याहुनही
पवित्र हे नातं गं
सात सुरांच्या साथीने
रंगलेलं हे गाणं गं
आनंदाच्या सरींसवे
बरसणारा तो श्रावण गं
अनोळखी वाटेवरचा
हक्काचा तो आधार गं
प्रत्येक संकटात पाठीवरती
तो विश्वासाचा हात गं
काय सांगु अजुन सखे
तुझं तुच समज गं
शब्दात तरी कसं मांडु त्याला
ह्या वेडीचा तो भाउही वेडाच गं

आई


आई म्हणजे चैतन्य
आई म्हणजे उत्साह,
आई म्हणजे हास्य,
अन् आई म्हणजे कारुण्यही
लहानपणापासुन बघतेय तिला
पण आता जराशी समजतेय
माझी सगळ्यात जवळची हि मैत्रिण
मला आता कुठे उलगडतेय
मात्रुत्वाच्या उंबरठ्यावर
मला माझी आई कळली
नऊ महीने गर्भात सांभाळताना
बाळा मला ती आईपण शिकवुन गेली

पुन्हा एकदा त्याच वळणावर


पुन्हा एकदा त्याच वळणावर
त्याच आयुष्याची नवी सुरुवात
विसरता न येणारया भुतकाळासवे
नव्या निश्चयाची नवी रुजवात

पुन्हा एकदा अट्टाहास
ह्या जीवनाचा अर्थ समजण्याचा
जुन्याच प्रश्नांच्या भेंडोळ्यात
मग नवीन उत्तरं शोधण्याचा