Sunday, February 1, 2015

निळ्या आभाळी उगाच हळवी हि संध्येची पाउलवाट 
सावळ्या घनाच्या विझत्या किनारी रुणझुणता काजळनाद

तुझ्या पाकूळल्या वयाला ओल्या दवाचा गं भार 
नाजुकश्या एका उसास्यानेही बघ मोहरतो पार

संध्येच्या ओंजळीत भल्या दिवसाचे दान 
उंबर्याशी घुटमळतो ओल्या रातीचा फकीर

तू नितळ आरस्पानी त्या निळ्याभोर आभाळापरी 
मी दडवून हजारो स्वप्ने फरफटतो भेगाळ भुईवरी

मिट्ट काळ्या रात्रीची ही गंधित अत्तरवेळ
स्वप्नांची भूल पांघरून सांजावली कातरवेळ

तुझ्या पावसाळी वयाला का हि पानगळी हौस
वैशाखाला नसतो ग अश्या वळीवाचा सोस

कसा वेल्हाळ पाउस पापणीत झिरपतो 
पागोळ्यांच्या नक्षीतला खुळा जीव हेलावतो

दूर दूरच्या गावात लखलखती मावळण 
तिच्या अंधार्या उंबर्याला चंद्राची भलावण

किती रे कोवळी हि तुझी भाग्यरेषा..
दाह तिच्या वणव्याचा हिला सोसवेल ना

No comments:

Post a Comment